'लाडकी बहीण' योजनेच्या अटीमध्ये महत्त्वाचे बदल, अर्ज भरण्यापूर्वी वाचा सर्व माहिती

Advertisement
Read Time: 2 mins
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
मुंबई:

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या महत्त्वकांक्षी योजनेची घोषणा पवार यांनी केली. मध्य प्रदेशातील भाजपा सरकारनं यापूर्वी ही योजना राबवली आहे. भाजपाच्या मध्य प्रदेशातील यशात या योजनेचा मोठा वाटा आहे. राज्यात तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुपूर्वी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारनं प्रयत्न सुरु केले आहेत. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'लाडकी बहीण' योजनेत बदल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी राज्यातील वेगवेगळ्या भागातून येत होत्या. यामधील काही अटींमुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहतील, असा आक्षेपही घेण्यात येत होते. या सर्व अडचणी आणि आक्षेपांचा विचार करत या योजनेतील निकषांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

राज्य सरकारनं केलेल्या नव्या बदलानुसार 21 ते 65 वयोगटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  त्याचबरोबर एकाच कुटुंबातील दोन महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ज्या कुटुंबांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. तसंच यासाठी असणारी पाच एकर उत्पन्नाची अटही काढून टाकण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

( नक्की वाचा : 'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक,पैशांची मागणी केल्यास काय कराल? शिंदेंच्या थेट सूचना )

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

'लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत 60 दिवसांपर्यंत वाढवण्यात आलीय. त्यानुसार 1 जुलैपासून पुढील 60 दिवसांत जे अर्ज करतील, त्यांना 1 जुलैपासूनचे पैसे मिळतील. 1 ऑगस्टनंतर जे अर्ज करतील, त्यांना त्या तारखेपासूनची रक्कम मिळेल.

या योजनेसाठीच्या कागदपत्रांमध्येही अनेक पर्याय देण्यात आले आहेत. राज्याबाहेरील महिलांना नवऱ्याचं सर्टिफिकेट असेल तरी लाभ मिळणार आहे. 15 वर्षांचं रेशनकार्ड, मतदार यादीतील नाव असे अनेक पर्याय यामध्ये देण्यात आले आहेत. केशरी आणि पिवळे रेशनकार्ड असलेल्या महिलांना या रेशनकार्डवरच योजनांचा लाभ मिळेल. त्याचबरोबर उत्पन्नाची अटही काढून टाकण्यात आली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 

Advertisement

एजंटच्या नादी लागू नका

'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज भरण्यासाठी कुणीही एजंटच्या नादी लागू नका. या प्रकारच्या एजंटची तक्रार करा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. या योजनेत मदत व्हावी म्हणून अंगणवाडी सेविका आणि सेतू केंद्रांना प्रती व्यक्ती किंवा प्रती अर्ज 50 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. यापेक्षा जास्त पैसे कोणत्या सेतू केंद्रानं घेतले तर ते केंद्र रद्द करण्यात येईल, असा इशारा फडणवीस यांनी केला. ऑनलाईन अर्ज भरला तर काम जलदगतीनं होईल, त्यामुळे जास्तीत जास्त भगिनींनी ऑनलाईन अर्ज भरावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.